लवंगांचा उपयोग फक्त मसाल्याच्या पदार्थात करतात, कोण म्हणतं?
पुलाव, आणि मसालेभात करायचा असेल तर आधी हाताशी दोन तीन का होईना पण लवंगा लागतात. लवंगा या फक्त तिखट, मसालेदार पदार्थांसाठीच लागतात असं नाही तर साखरभात, नारळीभात यासाठी आधी लवंगाच लागतात. तुपामध्ये लवंगा टाकून त्या मस्त फुगल्या की मग त्यावर तांदूळ परतले जातात. श्रावणात केल्या जणा-या प्रत्येक गोड पदार्थात लवंगांचा उपयोग करण्याची पद्धत आहे, त्यामुळे पदार्थाच्या स्वादात वाढ होते. पदार्थ बाधत नाही. तो पचतोही लवकर. गोड पदार्थ खाल्यानं निर्माण होणारा पोटदुखीचा त्रास कमी होतो.
सीझीजियम अँरोमॅटिकम किंवा यूजिनिया अँरोमॅटिकम किंवा यूजिनिया कॅरीफिलाटा असं वनस्पतीशास्त्रीय नाव असणार्याि माथरॅट्सी कुटुंबातील झाडाच्या कन्या म्हणजे लवंगा, लॅटिन भाषेतील खिळ्याला असणार्यार क्लॅबस् या शब्दावरुन इंग्रजी भाषेत लवंगेला क्लोव्ह हे नाव पडलं. संस्कृतमध्ये लवंग, देवकुसुम, श्रीसंज्ञ, श्रीप्रसूवक अशी नावं लवंगेला आहेत. इंडोनेशिया, मादागास्कर, झांजिवार, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये प्रामुख्यानं लवंगेचं उत्पादन होतं. लवंगाचं झाड पंचवीस ते चाळीस फूट उंच वाढतं. बाराही महिने हिरवंगार राहतं. या झाडावर तीन-तीन गुच्छांचा समूह तयार होतो. या गुच्छांना कळय़ा लागतात. या कळय़ा फुलून लहान फुलं होतात. या फुलांनाच लवंगा म्हणतात. फुलांच्या कळ्या प्रथम फिक्या रंगाच्या असतात. मग त्या हिरवट रंगाच्या आणि त्यानंतर लालभडक रंगाच्या होतात. खुडल्यावर या कळ्या वाळवल्या जातात. उन्हामधे त्या चार पाच दिवस वाळत असतांना सतत ढवळल्या जातात. वाळल्या की त्या ठिसूळ आणि गडद तपकिरी रंगाच्या होतात. त्यानंतर त्या निवडून स्वच्छ केल्या जातात. झाड लावल्यावर आठ ते नऊ वर्षानी लवंगा लागतात. ही झाडं साठ वर्षापर्यंत लवंगा देतात. सदाहरित असणारं लवंगेचं झाड १0 ते २0 मीटरपर्यंत उंच वाढू शकतं. लंबगोल आकाराची पानं आणि लाल फुलांचे झुपके या झाडाला येतात. बाजारात दोन प्रकारच्या लवंगांच्या जाती आढळतात. एक तीव्र सुगंध असणारी काळी लवंग, जी अस्सल समजली जाते. तर दुसरी भुरकट रंगाची. या लवंगांतून यंत्राद्वारे तेल काढलं जातं. जी लवंग उग्र वासाची, तिखट आणि दाबल्यानंतर तेलाचा अंश असतो, ती लवंग उत्तम प्रतीची समजली जाते. लवंगांची चव तिखट आणि किंचितशी कडवट असते.
आपण स्वयंपाकात वापरत असलेल्या बर्यााच मसाल्यांमध्ये लवंग वापरली जाते. चहाच्या मसाल्यातही लवंग असते. लवंग अख्खी किंवा पूड स्वरुपात दोन्ही प्रकारे वापरली जाते. विडयाचं पान बनवतांना पानांचा विडा सुटू नये म्हणून त्याला लवंग टोचून ठेवण्याची पद्धत आहे. साखरभात, नारळीभात या सारख्या गोड पदार्थांमध्ये तर बिर्याणी, पुलाव, मसालेभात यासारख्या खास पदार्थात आपण ती अख्ख्या स्वरुपात वापरतो. पण एक लक्षात ठेवायला हवं की मसाल्यांचा स्वाद उच्च तापमानालाच बाहेर येतो. त्यामुळे या पदार्थांसाठी तूप अथवा तेल भरपूर तापवून मग गॅस बारीक करून त्यात लवंगा टाकल्या तर त्या फुलून येतात आणि त्यांचा सर्व स्वाद बाहेर येतो. कमी तापमानाच्या तुपात किंवा तेलात लवंगा टाकल्यास सर्व स्वाद बाहेर येत नाही. पाश्चाबत्य देशांमध्ये अनेक प्रकारच्या बिस्किटांमध्ये लवंगेची पूड घातलेली असते. आपल्याकडे व्हेजिटेबल विंदालूसारख्या पदार्थांमध्ये जो मसाला वाटून घातला जातो त्यामध्ये लवंगेचा अंतर्भाव असतो. सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मामुळे मुरांबा, साखरआंबा यासारख्या मुरणार्या पदार्थांमध्ये लवंगा टाकण्याची पद्धत आहे. चायनीज फाईव्ह स्पाइसमध्ये तसेच मेक्सिकन व फ्रेंच स्वयंपाकातही लवंग वापरली जाते. चीजच्या काही प्रकारात लवंग व मिरे स्वादासाठी वापरतात. लवंग व लवंगेची पूड नीट साठवली तरच तिच्यातला स्वाद आणि औषधी गुणधर्म टिकून राहतात. म्हणून लवंग आणि लवंगेची पूड हवाबंद डब्यात साठवावी. शक्यतो काचेची बाटली यासाठी एकदम उपयुक्त. दातांच्या दुखण्यामध्ये वेदना शमविण्यासाठी लवंगेच्या तेलाचा उपयोग केला जातो. के जीवनसत्वही लवंगेत चांगल्या प्रमाणात असतं.
लवंगेच्या तेलाचा उपयोग मुरुमं, पुटकुळ्या यासाठी होतो. तिबेटी आणि चिनी औषधांमध्ये लवंगेचा खूप वापर केला जातो. लवंगेचे तेल अत्यंत तीक्ष्ण असते. सायटिका, कंबरदुखी, आमवात अशा वेदनादायक आजारात भीमसेनी कापूर मिसळून अभ्यंग केले कि वेदना कमी व्हायला खूप मदत होते. तोंडाला सारखा कफाचा चिकटा येत असेल तर लवंग चघळावी … तोंड लगेच स्वच्छ होते. पोटात टोचल्यासारख्या वेदना होऊन उलट्या होत असतील तर पाच सहा लवंगा उकळून त्याचा चहा करून देतात.
लवंग तेलाचा उपयोग माऊथवॉश, टूथपेस्ट बनवतांना तसेच अत्तराच्या कारखान्यातही केला जातो. लवंगेत जरी औषधी गुणधर्म खूप असले तरी तिचं सेवन अगदी अल्प प्रमाणातच करायला हवं. लवंगा विकत आणतांना टपोर्याम बघुन आणाव्यात. काही वेळा लवंगतेल काढून घेतलेलं असतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply