
साहित्य:
१/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे
३/४ कप बटाटयाचे मोठे तुकडे (बटाटा सोलून)
१/२ कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे (फ्रोझन)
१/२ कप हिरवे मटार (फ्रोझन)
१/४ कप फरसबीचे तुकडे (१ इंच)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१ कप टोमॅटो, बारीक चिरून
१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून
४ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ ते दिड टेस्पून काश्मिरी लाल तिखट (टीप ३ व ५)
२ टिस्पून साधं लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
६ टेस्पून तेल
२ टेस्पून कोल्हापूरी मसाला
इतर मसाले:
१/४ टिस्पून वेलची पावडर
२ चिमटी लवंग पावडर
१/२ टिस्पून बडीशेप पावडर
१/२ टिस्पून दालचिनी पावडर
१ चिमटी जायफळ पावडर
चवीपुरते मिठ
कृती:
१) कढईत २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलं-लसूण परतून घ्यावे. कांदा घालून लालसर होईस्तोवर परतावे. साधं लाल तिखट आणि टोमॅटो घालावा.मिठ घालून टोमॅटो अगदी नरम होईस्तोवर परतावे. हा मसाला थोडा गार होवू द्यावा. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
२) त्याच कढईत ३ टेस्पून तेल, मध्यम आचेवर गरम करावे त्यात हळद आणि १/२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट घालून लगेच फरसबी आणि बटाट्याचे तुकडे घालावे. मिक्स करून २ ते ३ वाफा काढाव्यात. बटाटे किंचीतच शिजू द्यावे. आच मोठी करून (बटाटे व तिखट करपणार नाही याची काळजी घ्यावी.) कांदा-टोमॅटोची प्युरी घालावी. आच मोठी ठेवल्याने तेल व्यवस्थित तापते आणि फोडणी चांगली बसते. मिश्रण निट ढवळून गरजेपुरते पाणी घालावे.
३) कढईतील मिश्रणाला उकळी येऊ द्यावी. त्यात कोल्हापूरी मसाला, बडीशेप पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, वेलचीपूड आणि चवीपुरते मिठ घालावे. गाजर, मटार आणि कॉलीफ्लॉवर घालावा. मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. १० मिनीटे शिजवावे.
भाजी तयार झाली कि १ ते दिड टिस्पून तेल फोडणीसाठीच्या कढल्यात गरम करावे. १ टेस्पून काश्मिरी लाल तिखट घालावे. आणि लगेचच हि फोडणी भाजीवर ओतावी. (टीप)
ढवळून भाजी सर्व्ह करावी.
टीप:
१) हि भाजी तिखटच असते, पण आपल्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) काश्मिरी लाल तिखटाला खुप छान लाल रंग असतो पण तिखटपणा नसतो. म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखट हे तिखटपणासाठी आणि काश्मिरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले आहे.
३) शेवटला जी काश्मिरी लाल तिखटाची फोडणी घालायची आहे ती पूर्णत: ऐच्छिक आहे, या फोडणीमुळे भाजीवर मस्तपैकी लालसर तवंग येतो. तसेच हि फोडणी घालताना तिखट गरम तेलात टाकल्याटाकल्या भाजीवर ओतावी, वेळ लावू नये नाहीतर तिखट करपते.
४) जे मसाले वापरले आहेत ते जरी कमी प्रमाणात आहेत तरी एकत्रितपणे खुप छान हलकासा स्वाद या भाजीला येतो. आवडीनुसार कुठलाही मसाल्याचे प्रमाण किंचीत वाढवले तरी चालते.
५) काश्मिरी लाल तिखटाने स्वाद आणि रंग चांगला येतो. जर अगदीच काश्मिरी लाल तिखट मिळाले नाही तर त्याऐवजी खायचा लाल रंग चिमूटभर वापरू शकतो.
— खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप
Leave a Reply