
गव्हाच्या कुरडया करताना ओले गहू भरडले जातात. त्याचा चीक वापरात येतो, मात्र वर जो कोंडा शिल्लक राहतो त्याच्या दोन पाककृती
पाककृती क्र. १:
गव्हाचा ओला कोंडा लगोलग तेलावर कांदा परतून आवडीनुसार तिखट-मीठ टाकून भाजीसारखा पोळी, भाकरीबरोबर खाता येतो किंवा आजच्या जमान्यात फ्रँकीसारख्या पदार्थाचे सारण म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो. फक्त कांदा कोंडय़ाच्या बरोबरीने असावा म्हणजे तोंडात अगदीच चोथा येणार नाही. अगदीच सोपी गव्हाच्या कोंडय़ाची भाजी!
पाककृती क्र.२:
पोहे चाळून भरताना खाली बारीक पोहे, कोंडा उरतो. तो फेकला जातो. मात्र हा कोंडा गव्हाच्या ओल्या कोंडय़ात मिसळावा. चवीनुसार लाल तिखट, मीठ घालावे. मिश्रण एकत्र मळताना गरज असल्यास पाण्याचा हात लावावा. व त्याचे सांडगे घालून वाळवावे. जे कालांतराने वरीलप्रमाणे कांद्याच्या फोडणीवर घालून भाजीसारखे खाता येतात. अथवा पोह्य़ाचा कोंडा व गव्हाचा ओला कोंडा एकत्र मळून चवीनुसार तिखट-मीठ घालून ताटात व्यवस्थित थापून घ्यावे. त्याला पुरेशी वाफ देऊन कोथिंबिरीच्या वडय़ांप्रमाणे वडय़ा पाडाव्यात. तेलात तळून खाल्ल्यास अतिशय कुरकुरीत लागतात. यालाच खारोडय़ा/ खारवडय़ा असेही म्हणतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply