व्यवहारी माणसांनी बुजबुजलेल्या या दुनियेत सद्गुण आणि दुर्गुण यांची पुष्कळदा मोठ्या विचित्र रीतीने गल्लत आढळून येते. अमुक एक गोष्ट केल्यास ती सद्गुणांच्या साच्यात बसेल, की दुर्गुणात जमा होऊन अखेर शेवटी आपल्याला जगातून उठवून लावील, हे व्यवहाराच्या निकषावर घासूनपुसून पारखून घेण्याचे कसब ज्याला लाभलेले नाही, त्या प्राण्याची या जगात किती केविलवाणी स्थिती होते याचे ढळढळीत उदाहरण म्हणून बोका पंढरीनाथ याच्या चारित्र्याकडे बेलाशक बोट दाखविता येईल. पंढरीनाथ म्हणजे केवळ एक चार पायांचे मांजर-पशू ! तरीही आलेल्या संधीचा फायदा घेऊन तो मनुष्यासारखे अस्खलित बोलायला शिकला, हा वास्तविक त्याचा केवढा अलौकिक सद्गुण !
-अनंत अंतरकर (बोलका बोका)