स्वैपाक संपवून ती बाहेरच्या खोलीत आली. दार सताड उघडे होते. टेबल,कोपर्यातील आरामखुर्ची, पलंग, पुस्तके-सगळ्या संसारावरून मंजुळेने शून्यपणे पाहिले. एक एक वस्तू जमवताना केवढे सौख्य लाभले होते. दीड वर्षापूर्वीच फक्त. पण आज असे का झाले ? इतक्या लवकर का उतरून गेला सारा उत्साह ? पूर्वीही कष्ट होतेच की. अन् इतरांच्या मानाने किती भाग्यवान आपण! काशी कुलकर्णीला जागा मिळत नाही. अलू बिलिमोरियाचा नवरा पैसा मिळवीत नाही. आपल्या संसाराला दोन खोल्या, दोन नोकर्या ! – तरीही भांडण, बिघाड ! कुठे बिघडलेय, काय बिनसलेय ?
— अरविंद गोखले (मंजुळा)