मोठी माणसं ही वागण्याने मोठी होतात. तेव्हाच समाज त्यांना मोठं म्हणून मान देतो. स्वामीकार रणजित देसाई यांनी सांगितलेली त्यांच्या आयुष्यातील अशीच एक आठवण. त्यांनी लिहिलेली स्वामी कादंबरी अतिशय गाजली. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. त्यावेळी या यशामुळे देसाईंचे मन आनंदाने फुलून गेले होते आणि साहजिकच मनात थोडा गर्वही वाढला होता. ते मोठे कादंबरीकार होतेच तरीही एक मोठा लेखक ही भावना त्यांच्या मनाने धरून ठेवली. एकदा ते आपले गुरु वि. स. खांडेकर म्हणजेच भाऊंना भेटायला गेले. भाऊ समोर दिसताच त्यांनी भाऊंच्या पायावर डोकं ठेवले. भाऊसुद्धा स्वामीच्या यशाने आनंदले होते. रणजित देसाईंनी त्यांच्याजवळ आशीर्वाद मागितला. त्यांच्या डोक्यावर हात ठेवत भाऊ म्हणाले, ”तुझं ‘राधेय’ प्रसिद्ध होईल तेव्हा ‘ययाती’ची कुणालाही आठवण न यावी इतकं यश तुला मिळू दे.” भाऊंचा हा आशीर्वाद ऐकून रणजित देसाईंचे डोळे भरून आले आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ”या क्षणी माझ्या यशाचा अहंकार कुठच्या कुठे निघून गेला.”
तात्पर्य – अहंकार होऊ न देणे यातच मोठेपणा आहे.
Leave a Reply