दोघं आता या अर्ध्या वयात लग्न करत होती. जरा दूरच्या एका मंदिराच्या निवांत जागी. छोटेसे मंदिर. उंच उंच पायर्या चढून वसवलेले. खालचा छोटासाा गाव हिरव्या झाडीनं वेढलेला, गर्दल घनदाटसा, मंदिराच्या छोट्या आवारातून खाली खेळण्यातल्यासारखा दिसणारा. ही डॉ. सुदर्शनच्या मनातली जागा. पूर्वी ते उमाबरोबर, त्यांच्या पत्नीबरोबर गेले होते एकदोनदा. कदाचित जास्त वेळा. ते संदर्भ त्यांच्या मनात होते. म्हणून लग्न तिथे करायचे, मुहूर्त सकाळी आठचा. आता दोघांनीही पन्नाशी गाठली नुकतीच. यावेळी विशिष्ट ठिकाण वेळ, मुहूर्त या गोष्टींना तसा रुळलेला अर्थ उरत नाही. लग्न या शब्दालाही नाही. तो तर तसा शब्दही नाहीच राहिला. शब्दाचे वरचे टरफल जाऊन आतली शुद्ध कोरी संकल्पना तेवढी उरलेली. तरी लग्न करायचे आहे. उमा गेली त्यालाही वर्षं लोटलीत.
– आशा बगे (पाऊलवाटेवरले गाव)
Leave a Reply