हॉस्पिटलला मैथिली स्वतः स्वतःशीच एक नवा खेळ खेळायला शिकली. हा खेळ खेळायला दुसरा भिडू लागत नव्हता. आपण जे नाही आहोत ते आहोत अशी कल्पना करून बघण्याचा खेळ. पूर्वीही संध्याकाळी वाळूत एकटं बसून साडेसात वाजण्याची वाट बघताना ती हा खेळ खेळली होतीच. समुद्रावरले कुठले कुठले पक्षी होऊन उडण्याचा खेळ. आता ती पुट्टू झाली आणि पुट्टू झाला मैथिली. उशीर झाला, की हॉस्पिटलमधेच तरातरा त्याची आई यायची, नि या नव्या पुट्टूला ओढून घेऊन जायची. तीच मग पुट्टूसारखी नव्या, मोठ्या शाळेत गेली. तिलाच छानसा सेंड ऑफ मिळाला. चित्रांचं पुस्तक आणि रंगकांड्या मिळाल्या. ती या खेळात सिस्टरही झाली. टिकटॉक बुटांचा आवाज करत कॉरिडॉरमधून मिरवली-कडक इस्त्रीच्या पांढर्या कपड्यांत. मग ती वेणूगोपाळसुद्धा झाली.
— आशा बगे (भूमी)