लगेच आपली भाकरीची गाठोडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर येऊन हातपाय धुऊन भाकरी खायला बसली होती. एवढेसे तुकडे तोडीत, चघळत भाकरी खायलाच तिला चांगला अर्धा तास लागला होता ! ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या सार्या पसार्यावर तिची दृष्टी भिरभिर हिडे. जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे जीवन तोंडी लावून पाहणे चालले होते…. अर्रर्रर्र…. केवढ्या भर्रर्रर्रदिशी धावतात या मोटारी ! अन् फसदिशी पाणी उडवितात मेल्या…. या भाजीवाल्या चालल्या. सोनेगावच्याच तर दिसतात. या… हो तर काय ! ती नाही का गोप्याची माय … भल्ली भरली टोपली भेंड्यांनी ! हार्याच्या वर कशा गोलच गोल करून उभ्या करून दिल्यान्…जसे काही शिपाईच…त्या उडान् खटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगिनी घेऊन – उभ्याच उभ्या …
– कुसुमावती देशपांडे (दमडी)