संपादक परिषद आणि त्याच प्रकारच्या इतर देशव्यापी संघटना सुरू होण्यास अनुकूल भूमी तयार होत होती, याची चाहूल काही इंग्रज अधिकार्यांना लागली होती. डब्ल्यू. बी. जोन्स या नावाचा एक अधिकारी हैद्राबाद इथे आयुक्त होता. त्याने २८ फेब्रुवारी १८७८ रोजी आपल्या वरिष्ठास लिहिलेल्या निवेदनात म्हटले होते की, पूर्वी जी राष्ट्रीयत्वाची भावना नव्हती ती गेल्या वीस वर्षात हळूहळू वाढू लागली आहे. वृत्तपत्रे परकीय राज्याविरूद्ध हिदी लोकांना आवाहन करू शकतात. वीस वर्षांपूर्वी आपल्याला काही स्थानिक लोक व वंश यांची दखल घ्यावी लागत होती. मराठ्यांचा रोष झाला तर बंगाल्यांना त्याबद्दल काही वाटत नसे. आता आपण हे सर्व बदलले आहे. आपल्याला आता एखाद्या प्रांताच्या लोकांना तोंड द्यावे लागत नाही तर सर्व वीस कोटी लोकांना द्यावे लागते. आपणच तयार करून दिलेल्या साधनांमुळे हे सारे लोक एकमेकांशी संवाद करू शकतात आणि एकमेकांबद्दल सहानुभूती बाळगून एक येतात. आजच्या घडीची ही सर्वात मोठी राजकीय वास्तवता आहे.
– गोविद तळवलकर (नेक नामदार गोखले)