;;ही कथा स्पृश्यांची. अस्पृश्यांचे हाल तर कुत्र्यानेंही खाऊ नयेत. सवर्णांना कमीत कमी पडशा-बोचकी ठेवण्यापुरता तरी बडव्यांच्या घरांचा किवा कुण्या मठाचा आसरा. अस्पृश्यांना तोही नाही. महारवाड्यात-सध्याचे बौद्धवाडे-आधीचे दुर्गंधीचे राज्य. मोडकळीस आलेली केंबळी घरे. ती मूळ मालकालाच पुरेनात एवढाली. तिथेच त्यांच्या बकर्या, तिथेच कोंबड्या. तिथेच दोर्या टांगलेल्या, त्यावर गोधड्यावाकळांचे भार. उखळलेल्या जमिनी. महिन्या-महिन्यांत त्यांना सारवणाचा स्पर्श नाही. तिथेच एका कोपर्यांत जातें. चर्हाटें. बकर्यांच्या लेंड्या. तिथेंच कोंबड्या शिटलेल्या. पोरें हगलेलीं. तिथेच कुठे तरी मोर्या. त्यातून वाहाणारे, दुर्गंधीनें भरलेले पाणी-पण निष्ठावन्त अस्पृश्य वारकरी दर वारीस यायचे, आणि डोळे मिटून या दुर्गंधीतच उतरायचे. त्यांना मंदिरांत प्रवेश नसायचा. त्यांनी कळस पाहूनच समाधान मानावे.
— गो. नी. दाण्डेकर (श्रीगाडगेमहाराज)