पौषात आंब्याला मोहोर येणे, चैत्रात मोतीयाला बहर येणे आणि ज्येष्ठात पावसाळ्याला आरंभ होणे या गोष्टी, पाण्याची धाव सखल प्रदेशाकडे असण्याइतक्या, सहज घडून येणार्या आहेत; पण साध्या गोष्टीही केव्हा केव्हा अवघड होऊन बसतात. यंदा तसेच झाले. मृग नेहमीप्रमाणे लागले आणि संपूनही गेले; तरी पाण्याचा थेंबही ठिबकला नाही. चैत्र-वैशाखात वळीवाचा एखाद दुसरा पाऊस पडावा, तर तेही झाले नाही. त्यामुळे कुणब्यांच्या तोंडचे पाणी पळाले. बिचारे कुणबी ! मेघराजा हा त्यांचा देव ! आणि पाऊस ही त्यांची कृपा ! देवाची कृपा पावसाच्या रूपाने ओघळली नाही, तर काय करावे त्यांनी ? कुणाकडे बघावे ? त्यातून गेल्या आठ दिवसात पावसाने नुसत्या हुलकावण्या दाखवल्या. दुपारपासून आभाळ भरून यावे, संध्याकाळपर्यंत ओसरून जावे.
— चि. य. मराठे (तिसरी पिढी)