परिक्रमेतील नियम आहे की, नर्मदेचे पाणी कुठेही ओलांडायचे नाही. पुलावरून जायचे नाही, फाटा फुटलेला छोटा नर्मदेचा ओघळही ओलांडायचा नाही. त्यामुळे डोंगराच्या उतारा-चढावात जी नाली झालेली असते, तिच्याही पलीकडून जायचे. नर्मदा सरोवर धरणामुळे अंदाजे २०० किलोमीटरपेक्षा अंतर वाढले आहे. त्यामुळे डोंगर उतरणे-चढणे, पाय घसरून पडणे, पायाच्या सालट्या निघालेल्या, झाडीच्या फांद्यांनी मांड्या, पोट, पाठ, पोटर्या, दंड, मनगटावर सुकलेल्या रक्तोचे ओरखडे. कुठे कुठे तर घसरताना हाताचे तळवेही सोलवटले. त्यातच पायाला विचित्र जखम झालेली. उजव्या पायाच्या तळव्याच्या वरच्या भागावर जखम खोलवर गेलेली. पायाचे तळव्यापर्यंत भगदाड. त्यात चिखल, रेती, माती, काटेकुटे जाऊन जखमेकडे पाहण्याचे धाडस होणे कठीण, पण पुढे चालणेही कठीण झाले. ढुंगणावर खुरडत, हाताच्या तळव्यांनी आधार घेत परिक्रमा पुढे चालू. बडा मजा आया.
— जगन्नाथ केशव कुंट (नर्मदेऽऽ हर हर !)