त्या आजारीपणात त्याच्या लक्षात आलं की तापाचा झळ लागून तिचे दागिने काळे पडले आहेत. उजाळा देण्यासाठी आस्थेनं त्यानं ते तिच्याजवळून काढून घेतले. तिच्या आजारपणात त्याची चांगली आबाळ झाली होती. बाहेर लोक चैन करीत होते नि हा पाहत होता. नवीन नवीन वस्त्रांची लेणी ते चढवीत होते. पण कितीएक वर्ष एक लोकरीचा कोट करायचा त्याच्या मनात होतं तरी अजून जमत नव्हतं. शिवाय हातात एखादी अंगठी हवी होती. घड्याळाची तर फार जरूरी होती. जरूर असलेल्या गोष्टी लवकरच पुर्या झाल्या. आपल्या दागिन्याचं हे नवं रूप ओळखायला तिला उशीर लागला नाही. पण ती काही बोलली नाही, तोही काही म्हणाला नाही. पण त्याची नजर मात्र वारंवार तिच्या मंगळसूत्राकडे जाऊ लागली. विनाकारण दोन तोळे सोनं तिथं अडकून पडलं होतं नि किती तरी गष्टी संसारात हव्या होत्या. त्याची ही नजर तिच्या लक्षात आली. मग एक दिवस तो अधाशीपणे पाहत असता तिनं मंगळसुत्रावर हात ठेवला नि डोळे वटारून मान हलविली.
– दि. बा. मोकाशी (तिचा नवरा)
Leave a Reply