माघात दृग्गोचर होणारे हे काट्या-कुट्यांचे, उघड्या फांद्याचे दृश्य मनात अधिक भरते. केव्हा, तर या वठलेल्या झाडावरची गेल्या हंगामातील पक्ष्यांनी सोडलेली जुनी घरटी पाहून, या निर्जन घरट्याशिवाय मला तर माघ-फाल्गुनांतल्या निष्पर्णतेचा विचारच करता येत नाही. ही पाहा कावळ्यांची काट्या-कुटक्यांची घरे अस्ताव्यस्त झाली आहेत व स्वैर पसलेल्या डहाळ्यांहून बेचक्यातला तो दुरून विस्कटलेला दिसणारा घरट्याचा गोळा किती निराळा दिसतो आहे. वस्तुतः तोही झाडांच्या सुक्या काड्यांचाच बनलेला. पण त्यात प्राण्यांची कृती व हेतू अजून भरलेले दिसताहेत. पडीक घर माणसांचा इतिहास बोलका करते, तसे ओसाड घरटे पक्ष्यांच्या वात्सल्याची परंपरा या वेळी जणू बोलून दाखवीत असते, पक्षीजीवनाचा अनाद्यंत संकेत सांगत असते.
– दुर्गा भागवत (ऋतुचक्र)