पार्कमधील एका बाकावर श्री. ईश्वर हे ‘आदिमाये’समवेत विराजमान झाले होते. मी जरा जवळ गेलो व त्या तरूण गृहस्थाकडे जरा निरखून पाहू लागलो. त्या तरूणाचे गाल बसून डोळ्याभोवती काळे रिंगण उमटले होते व त्याचा चेहराही जरा चिताग्रस्त दिसत होता. त्याच्या अशत्त*पणाचे कारण मी तेव्हाच ओळखले. राजहंसाला मोत्याचा व ईश्वराला भक्तीचा चारा हवा. पण या कलियुगात लोक अगदीच नास्तिक झाल्यामुळे व जे काही थोडेसे आस्तिक आहेत त्यांची सारी भक्ती साधू व महात्मे यांच्या कारणी लागल्यामुळे ईश्वराला त्याच्या आवश्यक खुराकाची टंचाई पडणे अगदी साहजिक होते. पण मला त्याच्या चितेचे मात्र कारण समजेना.
— ना. म. घाटे (श्रीयुत ईश्वर)