घरात दुसरे भावंड जन्माला येणे ही गोष्टसुद्धा मुलांच्या बालविश्वात एकदम क्रांती घडवणारी असते. घरातले मुलाचे सार्वभौमत्व एकदम संपते. एक कायमचा वाटेकरी निर्माण होतो. साहजिकच ते आपल्या परीने प्रतिकार, कांगावा करते किवा झुरते, कोमेजते. आणि ही परिस्थिती मूल किंवा पालक कोणालाच आनंददायक नसते. लहान मुलाच्या आयुष्यात, भावविश्वात अशा ज्या लहानमोठ्या पोकळ्या असतात त्या ‘शिशुविहार’सारखे एखादे आदर्श बालमंदिर भरून काढू शकते. तेथल्या अनुकूल, समृद्ध व निरंकुश वातावरणात मूल स्वतःच स्वतःला घडवत राहते.
– पद्मजा फाटक (शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक)