मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला ‘मुंबई’च म्हणतो. मुंबईत एकदा तुम्ही जन्माला आलात कि मुंबईकर होतच जाता. किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन मुंबईकर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या मराठीमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. मुंबईत जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू तसे काळही दोनच,वर्तमान आणि भविष्य. मुंबईला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच. तिला फक्त आज आणि उद्या. मुंबईकराला ‘शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता?’ यापेक्षा सकाळच्या फास्ट लोकल कुठल्या? याची माहिती अधिक महत्वाची. घड्याळाच्या तासाप्रमाणे मिनिटही मोलाची असतात हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही.कारण मुंबईकराचे घड्याळ हे केवळ हाताला बांधलेले नसून त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं. पण मुंबईमध्ये मुंबईकर होणं हे काहीही सक्तीचं नाही. हा ऐच्छिक विषय आहे.
पुण्यात मात्र पुणेकर होणं हे सक्तीचं आहे.
— पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)
(पुलं.ची भाषणे)
Leave a Reply