दिवा लागला, घड्याळ थांबले व तो समोरचा विद्यार्थी धडा घोकू लागला. हाच त्याचा ध्यास. बालिश पुस्तके, अज्ञानातल्या परीक्षा, स्पर्धा, यश ! मी तुला मारीन, तू खाली-मी वर, मी पहिला व तू नंतर ! आणि मग पुढे ! हेच सारे अधिक उग्र आकसाने, अधिकच निर्मम उत्साहाने ! तू खाली व अवश्य तर तुझ्या प्रेतावरही मी ! पण मुला, अरे हे काय म्हणून सारे !… आणि रामूकाका, भल्या पहाटे लांब-लांब चोपड्या घेऊन कशाचा हिशेब करता ? मजल्यावर मजले, थैल्यावर थैल्या ! दात पडले, केस पिकून गेले, मान हलू लागली, तरी अद्याप हाच ध्यास ! चांदीच्या टिकल्या मोजीत आहात काका ? वेड्या माणसा, कधी आयुष्याचे क्षण मोजून पाहिले आहेस काय ? कधी कृतकर्मांचा हिशेब मोजून पाहिला आहे ? काळ झडपून नेईपर्यंतही काळाची चाहूल घेणार नाही का तुम्ही ?
– पु. भा. भावे ( निवडक पु. भा. भावे)
Leave a Reply