ती अंधारलेली खोली विसंवादी सुरांच्या मिश्रणाने सारखी कापत होती. वठणीवर आणलेल्या पोरट्यांच्या वाकलेल्या मस्तकावरून नानाकाका मोठ्या समाधाने नजर फिरवीत होते. त्यांच्या पायांशी त्यांची दमलेली काठी आडवी पडली होती. केवळ मानसिक समाधानासाठी मधूनच ते हात उगारून एखादी षष्ठीप्रत्ययान्त शिवी हासडीत तेव्हा त्यांच्या अंगरख्यावर मुखरसाचे चारदोन नवे डाग ओघळत. पलीकडच्या खोलीत रमाबाई काहीतरी पुटपुटत भांडी आपटीत होत्या. ‘पोरांची जात’, ‘दुस्वास’ आणि ‘राक्षस’ या तीन शब्दांचा त्या वारंवार उच्चार करीत. नानांची श्रवणशक्ती मंदावलेली होती, हेच त्यांच्या व त्यांच्या सुनेच्याही दृष्टीने ठीक होते. नाही तर मुलांच्या बाळसेदार आरोग्याला मरवडा घालून त्यांना ‘दांडगेश्वर’ म्हणणारा माणूस स्वतःच ‘उलथून’ जायला पाहिजे, असे आपल्या सुनेचे मत असल्याचा शोध नानांना लागला असता आणि नानांना मुलांना शिकवण्यापेक्षा मुलांना मारण्याचीच हौस जास्त आहे, असाही रमाबाईंचा प्रामाणिक विश्वास असल्याचे त्यांच्या ध्यानात आले असते.
– पु. भा. भावे (पहिला पाऊस)
Leave a Reply