लावणी रीमिक्सच्या आजच्या जमान्यात मूळ पारंपरिक बाजाची लावणी भ्रष्ट होत चालली आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना सुलोचनाबाईंनी सांगितलं, ‘‘लावणी सतत बदलते आहे, कारण ती रसिकांच्या आश्रयावर वाढली आहे. पारंपरिक लावण्या आज ऐकायला मिळणार नाहीत, असं नाही, पण आता जीवन जसं गतिमान झालंय, तशी लावणीही अधिक गतिमान झाली आहे. ‘राम जोशी’, ‘कलगीतुरा’ आदि चित्रपटांतील लावण्या आज ऐकल्या तर त्या भावगीतांच्या अधिक जवळ वाटतात. ‘लावणी ऑन फायर’ च्या आजच्या काळात लावणीनं आपला जाळ कायम ठेवला आहे, हे नाकारून चालणार नाही. म्हणून तर हल्ली लावणी महोत्सवांच्या जाहिरातीत अथवा लावणीवर आधारलेल्या कार्यक्रमांच्या जाहिरातीत ‘अस्सल लावणीचा जाळ’ असा उल्लेख गौरवानं होतो.’’
– प्रकाश खांडगे (पदरावरती जरतारीचा)