या सुंदर, रमणीय आलेखावर काळी रेघ ओढत, नखशिखांत काळभोर बुरखा घातलेल्या काही अफगाण बायका एकीपाठोपाठ एक अशा रांगेनं, एका बाजूनं आल्या आणि तिथंच असलेल्या कोपर्यावरच्या एका बैठ्या इमारतीमध्ये शिरल्या. ते दृश्य पाहून मला अमृता शेरगीलच्या पेंटिगची आठवण झाली. उदास, हुरहूर लावणारी, आर्त आणि तेवढीच उत्कट. त्या अफगाण बायका दिसेनाशा झाल्यावर मी माझ्याबरोबरच्या शहानाजला विचारलं, ‘‘या कोण बायका गं ? अशा कुठं गेल्या त्या ?’’ खाली मान घालून आपल्या कोटावरचं बर्फ झाडत माझी मैत्रीण उडतउडत म्हणाली, ‘‘त्या बायका होय ? फतेहा पढण्यासाठी निघालेल्या दिसतात. ती बिल्डींग म्हणजे बायकांचा फतेहखाना आहे. त्यांच्या घरचं कोणी तरी मेलेलं दिसतयं, म्हणून निघाल्या असतील तिथं.’’ ‘‘बायकांना परवानगी आहे का फतेहा पढण्याची ?’’ ‘‘हो, आहे ना. पण बायकांचा फतेहाखाना वेगळा असतो. आणि तिथला मुल्ला असतो तो एक साधारणपणे सत्तर बहात्तर वर्षांच्या पुढचा; आणि त्यातूनही आंधळा. गंमतच आहे की नाही ?’’ शहानाज डोळे मिचकावीत म्हणाली.
-प्रतिभा रानडे (अफगाण डायरी)