सार्या मगधभूमीत क्रांतीचं बीजारोपण करण्यासाठी त्यानं तिथली सारी भूमी मऊ मोकळी केली होती. नव्या राजरोपाचं बीजारोपण त्याला आता करायचं होतं. चंद्रगुप्ताचं रोप लावायचं होतं. त्या रोपानं मूळ धरलं, तर मगधात त्याच्या नेतृत्वाखाली क्रांती घडवून आणायची होती. धनानंदाची उन्मत्त, भ्रष्ट सत्ता उलथून टाकायची होती. चंद्रगुप्त हा जर राजरक्तातला निघाला, तर चाणक्याच्या दृष्टीनं दुधात साखर पडणार होती. चाणक्य जेव्हा वनात जाऊन पोहोचला, तेव्हा नुकतंच उजाडलं होतं. सूर्याची कोवळी किरणं परिसरातील वृक्षांवर पडली होती आणि वृक्षांची पानंफुलं सोन्याची झाली होती.
– भा. द. खेर (चाणक्य)