दुपार कलंडत आली नि व्हायोलिनवाला पोरांना शाळेतून घेऊन आला. सगळ्यात पुढे होता वासू…तो धावत झोपडीत शिरू लागला; तसा पुढे होऊन दादूने त्याला अडवले. ‘‘आ बेटा, हमारे यहाँ आ-’’ मुलांची चाहूल लागताच बाहेर आलेल्या सकीनाला तो म्हणाला – ‘‘उसको भी आब्बासके साथ खाना दो-’’ तोंच काशीरामची म्हातारी बाहेर आली. नातवाला पाहून ती छाती पिटून रडू लागली. वासू कावराबावरा होऊन पाहूं लागला… कांही तरी वेगळे मनांत आणून ‘‘माजी आये…’ करीत ओठ वेडेवाकडे करू लागला… तोच त्याला सकीनाने हाताला धरून आंत नेले. सरजूने काशीरामच्या म्हातारीला झोपडीत पाठवले – ‘‘त्या पोराला खाऊं दे घासभर नि मग मार बोंब-’’ तो तिच्या अंगावर खेकसला.
— मधु मंगेश कर्णिक (माहीमची खाडी)
Leave a Reply