मिडासची फ्रिजिअन भांडी आणि दागिने ठेवलेले होते. ग्रीकांच्या खूप जुन्या मायसीनियन संस्कृतीचेही हात इथं लागले होते. नंतरच्या हेलिनिस्टिक काळातल्या देवतांच्या पुतळ्याचं वेगळं खास दालनच आहे. तिथला इयूस, आफ्रोदोती वगैरेंचे पुतळे पाहताना आपण अथेन्सच्या म्युझिअममध्ये तर नाही, असं वाटलं. रोमन सम्राटांनीही बहुसंख्य हजेरी लावलेली आहे. हे पुतळे उत्तम कोरलेले आणि उत्तम स्थितीत आहेत. एका दालनात संगमरवरी शवपेट्या होत्या. त्यांच्यावर सगळी ग्रीक पुराणं मूर्तरूप झालेली. एकीवर हेराक्लीजची बारा कामं कोरलेली होती. त्यांचा नायक उमद्या युवकापासून दाढीवाला, सुरकुत्यांच्या जाळ्यात सापडलेला पक्व, प्रौढ होत जाताना दिसतो. ग्रीसहून इतक्या दूर त्यांची दुर्मीळ दौलत जपून ठेवलेली पाहून बरं वाटलं. बाजूच्या एका छोट्या दालनातल्या ख्रिश्चन चीजांमध्ये इटालिअन चाच्यांच्या धाडीतून सुटलेले सेंट निकलसच्या कवटीचे तुकडे आणि जबड्याचं हाड सुरक्षित राखलेलं आहे.
– मीना प्रभु (तुर्कनामा)