सेमिनारचं पेपरलेखन निर्मला डॉक्टर मेहेंदळ्यांना मदत म्हणून करत होतीच. आज तिला एक लेक्चर होतं नि सरांनाही लायब्ररीत जायचं होतं. दोघं बरबरच निघाले होते. शेजारच्या बंगल्यात मुलं क्रिकेट खेळत होती. सर एकदम कंपाउंडपाशी गेले, तोच बॉल झपकन त्यांच्या पायावर बसला. अगदी पूर्वी झालेलाच प्रसंग ! त्यावेळी बडबडीनं डोक्यावर घेतलेला सारा खेळ …. त्या बंगल्यात शिरून मुलांच्या पालकांजवळ केलेली शिवराळ तक्रार …. पण आज …. त्यांनी बॉल उचलला. काही अंतर मागं येऊन त्यांनी सराईत क्रिकेटरसारखी धावत जाऊन बॉलिंग करत बॉल फेकला नि ओरडले, ‘‘किती रन्स ?’’ मुलांनीही गलका केला. मग पुढं होऊन ते म्हणाले, ‘‘इकडे या नाही तर. माझ्या बंगल्यात अधिक मोकळं नि प्रशस्त मैदान मिळेल तुम्हाला. निर्मलानं आता कसं स्वच्छ, मोकळं केलंय हे आमचं मैदान.’’
— मोनिका गजेंद्रगडकर (भूप)