आमचे मूळ गाव कोकणात. गाव कसले ते ! ते एक लहानसे खेडे आहे. गावातील सगळी घरे केंबळ्याची. आमचेच घर काय ते कौलारू. इनमीन तीन झोपड्यांचा गाव, पण वरच्या झोपडीला वरची आळी, खालचीला खालची आळी, आमचे घर मध्ये आहे म्हणून त्याला मधली आळी, अशी रीतीने गावठाण विभागले होते. गावात एखादे माणूस जन्मले किवा एखादे मेले तर त्या गावची खानेसुमारी बदले व लोकसंख्येत कितीतरी पटीने फरक पडे. आमच्या परसात सह्याद्री आकाशाला डोके देऊन उभा, तर अंगरात अरबी समुद्राच्या लाटांच्या तुषारांचा सडा पडावयाचा. सह्याद्री छातीवर हाताचे स्वस्तिक करून अनंताचा अंत दूरवर नजर करून पाहत निश्चल नजरेने उभा. तर रत्नाकर हरदासासारखाभरती-ओहोटीच्या वेळी मागेपुढे होत लाटांच्या गर्जनेने हरिकीर्तन करीत गावची पुळण धुऊन काढून काळाच्या वाळूच्या घड्याळाची तयारी करी. या गटींमुळे आमच्या गावाला म्हावरे व रानची शिकार भरपूर मिळे.
— र. वा. दिघे (शिकार)
Leave a Reply