ती बाई मोठ्या हावरेपणाने सारे पाहत होती, सारे ऐकत होती, सारे समजून घेत होती. तिला वाटले आपल्यावर कुणी जादूचेटूक केले असावे. त्याविना हे इंद्रजाल दिवसाढवळ्या दिसणे शक्य नाही. दुनिया इतकी कशी बदलली ? तिला स्वतःमध्ये यत्किंचितदेखील फरक दिसत नव्हता. आणि आपण जिवंत आहोत याबद्दल तिची खात्री होती. ती अधिकच बावरली. आपण कुठे भुलून भटकून तर चाललो नाही ? इथली सारी नव्हाळी आपल्याला हिणविते आहे असा तिला भास झाला. तिला स्वतःची लाज वाटली. भूकंपाबद्दल आता तिची खात्री झाली. त्यानेच हे बदलून गेले असावे. इथली पूर्वीची घरे गेली आणि जमिनीच्या पोटातून ही नवी सृष्टी पैदा झाली. आणखी एक कल्पना तिच्या मनात आली. आकाश तरी शिल्लक आहे की नाही ? आकाशात चंद्राचा तुकडा ढगातून सरकत चालला होता.
– वामन चोरघडे (तिची जन्मठेप)
Leave a Reply