पंधरा-सोळाच्या आसपास असलेली तिची मुलगी काशी पहिल्या नव्हाळीने फळास आलेल्या उंबरीच्या झाडासारखी पिवळी आणि रसरशीत दिसत होती. उन्हातान्हात व काट्यागोट्यात हिंडताना तिचे तोंड गेंदासारखे गरगरून येई व त्यावेळी ती त्या उंबराच्या फळासारखी लालसुरंग भासे. तिच्या कमरेपर्यंतचा खालचा भाग गोंदलेला होता. गोंदणे ही त्यांच्या धार्मिक समजुतीची बाब. गोंदल्याशिवाय त्यांच्या जातीत लग्नाला परवानगी नाही. काशी दोन-चार वर्षांची झाल्याबरोबरच हा विधी करण्यात आला होता.
— वामन चोरघडे (मातीची भांडी)