सकाळचे पोथीवाचन संपले की अहिल्याबाई मंदिरातून बाहेर येत असत. झाडाच्या पाराभोवती भिक्षुक मंडळी जमत असत. ते सगळे भोवतालच्या निरनिराळ्या गावांतून आलेले असत. नोकरांनी शिध्याचे धान्य आणून ठेवलेले असे. अहिल्याबाई मंदिराच्या प्रांगणातल्या ओट्यावर येऊन बसत. एक एक ब्राह्मण पुढे येत असे. बाई आधी त्याला अभिवादन करीत असत. गावच्या पिकापाण्याची, घरातल्या मुलाबाळांची, म्हातार्याकोतार्यांची चौकशी करीत असत. त्या त्या ठिकाणचे होळकरांचे कमाविसदार, त्यांचे चाकर यांची हालहवाल विचारत असत. नंतर शिधा देत असत. होळकरांच्या कमाविसदार, शिलेदारांची भलीबुरी वागणूक ते ब्राह्मण ऐकवत असत. पिकापाण्याचे कमी जास्त कसे आहे ते सांगत असत. ते ऐकून बाईंना त्या त्या गावाचा अंदाज येत असे. त्याप्रमाणे त्या मनात योजत असत, अमुक गावात विहीर खोदायला हवी. तमुक मंदिराजवळ अन्नछत्र सुरू करण्यासाठी जबाबदार माणूस शोधायला हवा.
– विनया खडपेकर (ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर)