टेबलावरच्या पुस्तकांकडे तिची दृष्टी गेली. पाच वर्षांपूर्वी केवढ्या उत्साहाने ती टेबलाजवळच्या खुर्चीवर बसली होती ! लहान मुलींच्या आयुष्याला वळण लावण्याचे पवित्र कार्य आपण अंगीकारले आहे या श्रद्धेने तिने आपल्या कामाला सुरुवात केली होती. पुस्तके वाचायची, नोट्स काढायच्या, मोठमोठ्या स्त्रियांची चरित्रे मुलींना सांगायची, वादविवाद मंडळाकरिता भाषणे तयार करायची-किती गडबडीत गेले होते तिचे पहिले वर्ष ! पण पहिल्या वर्षाची गोडी दुसर्या वर्षी वाटली नाही, तिसर्या वर्षी तिला थोडा कंटाळा आला, चवथ्या वर्षी ‘तुम्हांला काही होत नाही’ असे डॉक्टर बजावून सांगत असतानाही ती मधून मधून टॉनिक घेऊ लागली, आणि यंदा तर…
– वि. स. खांडेकर (आठ जून)