नानासाहेब पुढल्या ओटीवर निजत. स्वतःसाठी लांबरूंद बनविलेल्या पलंगावर. डोक्याशी गजराचं घड्याळ, पाण्याचा तांब्या, तसलंच आणखी काही असेल, ते. मच्छरदाणी पांढरी शुभ्र, नीट व्यवस्थित लावलेली. वाड्यातली बरीचशी मूलं ओटीवर निजायला यायची. घरी जागा नसे, म्हणून. नानासाहेबांकडे बरं वाटायचं, म्हणून. आपसात बोलता बोलता मुलं झोपी जात. नानासाहेब अकरापर्यंत पलंगाजवळ येत नसत. अकराच्या सुमाराला ओटीवर आले, की तिथं निजलेल्या मुलांकडे पाहत कुणाचा हात सतरंजीबाहेर आलेला असे. कुणी लोळत लोळत गादीबाहेर गेलेला असे. नानासाहेब त्यांना सारखं निजवीत, अंगावर पांघरुण घालत नि मग दत्ताचं नामस्मरण करीत झोपी जात.
— शं. ना. नवरे (सर्वोकृष्ट शन्ना)