पण मला अशी चमत्कारिक खोड लागली आहे की, इतरांच्या संगतीत वर मान करून चाललो असता तो जो आंधळा एकतारीवाला फूटपाथवर बसलेला असेल त्याच्याकडेच लक्ष जावयाचे ! शेकडो-हजारो श्रीमंत, देखणी, नटलेली-सजलेली माणसे भोवताली चालली असता, माझी दृष्टी चोरून त्या अंधाकडे जाते. त्याने ते रेकत म्हटलेले ‘‘तुका म्हन्ये-’’ ऐकले म्हणजे मनात कालवाकालव होते व तुकारामाचे म्हणणे काय आहे ते ऐकावयास कुणाची तयारी नाही हे पाहून वाईट वाटते. हे इतके लोक जरी सुखी असल्यासारखे दिसले तरी ते खरोखरीच सुखी असतील, असे नाही. ते हसत आहेत याचे कारण इतकेच असावे की रात्रंदिवस कुठल्या तरी एखाद्या बोगद्यासारख्या खोलीत कोंडून पडल्याने रंजीस आलेले, पण आता समुद्राकाठचा वारा प्यायल्याने खुललेले असे हे जीव असावे. दिवसभर त्रास सोसल्यावर त्यांनी थोडे हसू खेळू नये ?
— श्री. म. माटे (हास्याचा शोध)