साहित्यिकाला काही तरी जबरदस्तपणे जाणवलेले असते, हे जे त्याला जाणवलेले असते त्याने त्याचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे व्यापून टाकलेले असते, त्याला एक उत्कट, अनावर रूप आलेले असते. लेखकाला लिहावेसे वाटते याचे कारण त्याचा हा अहंकार एक असाधारण रूप धारण करीत असतो आणि या अहंकारामुळे स्वतःचे स्वत्त्व स्वतःच्या बाहेर पल्लवित करण्याचा एक आंतरिक आग्रह लेखकाच्या ठिकाणी उत्पन्न होत असतो. यामुळे हा पल्लवित झालेला अहंकार किवा हे व्यत्ति*मत्त्व दुसर्यापर्यंत पोहचते. नुसते पोहचते असे नाही, तर ते त्याला आकर्षून घेते, कारण अहंकाराचे समाधान दुसरा जो कोणी आहे तो प्रभावित झाला, तो आपला झाला, यामध्ये असते. प्रतिभावंताचा हा अहंकार सात्त्विक रूपाचा असतो. हा अहंकारच त्याच्या लेखनामागील प्रेरक शक्ती असते. या अहंकाराने प्रेरित झाल्याशिवाय लेखन होऊच शकत नाही.
– श्री. व. दि. कुलकर्णी (शिरवाडकरांची नाटके)