असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. ज्णू या दोन वस्तू शेकडो जन्मांत मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो ! मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल; पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल ? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्याफांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडावॉटरची बाटली फोडली, की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे; परंतु दुसर्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही.
— साने गुरुजी (श्यामची आई)
Leave a Reply