निसर्गाची पिल्ले…पाखरे पहाटे व संध्याकाळी किलबिलाट करून सारा परिसर डोक्यावर घ्यायची…बराच वेळ किलबिलाट झाला, की आंटी बाहेर येऊन त्यांना हुसकून लावायची…म्हणायची, ‘‘जा मेल्यांनो ! जा उंडारा आता.’’ मग ती सारी भराभर उडून जायची. वेगवेगळ्या रंगांची पिसे ल्यालेली ती पाखरे…उडून जाताना आपली पिसे ती फुलवायची. तेव्हा त्यांचे ते विविध पोशाख पाहून आंटी मनोमन खुश व्हायची…मनातच म्हणायची, ‘आपल्याला एखादी मुलगी असती, तर…किती छान सजवले असते तिला…रंगीबेरंगी तुरे लावून ह्या पक्ष्यांबरोबर तिलाही पिटाळले असते…भरारी मारायला.’ आपल्या मुलीला सजवण्याची तिची सारी स्वप्ने पंख मिटून तिच्या मनाच्या खोप्यात तशीच पडून होती. निपचित !
— सिसिलिया कार्व्हालो (झबल्यांचे झाड)