आता आपले आडनावच घे. आपले आडनाव ‘सोमण’ हे कसे आले असेल ? शब्दांचा उगम आणि विकास पाहणे आवश्यक आहे.निरनिराळे शब्द कसे आले असतील ? अनेक भाषांतून आपण शब्द उसने घेतो. आणि मग ते आपले म्हणून ठेवतो. तुझ्या आईच्या स्वयंपाकघरातच पाहा ना ! आपण समेळकाकींची चाळणी, दादा गदर्यांचा आडकित्ता, जानकीकाकूंची किसणी आता आपलीच म्हणून नाही का वापरीत ? आणि तीही मंडळी त्याबद्दल काही बोलत नाहीत. तसेच इतर भाषांतले शब्द आपण मराठीत घेतो त्याबद्दल कोणी बोलत नाहीत. परंतु इतर लोकही आपले शब्द घेतात. उदाहरणार्थ,‘पोस्ट’ हाच शब्द घे. पूर्वी पोस्टाला टपाल किवा डाक म्हणत. पुढे डाकवाले होळीदिवाळीला ‘पोस्त’ मागत हिंडू लागले, तेव्हा त्यांना ‘पोस्तवाले’ म्हणू लागले. आणि पोस्तवाले जिथे काम करतात ते पोस्त ऑफिस. इंग्रजांना ‘त’ चा उच्चार येत नाही. ‘तुला’ च्या ऐवजी ‘टुला’ व ‘तुम्ही’ ला ते ‘टुमी’ म्हणतात, त्याप्रमाणे ‘पोस्ता’ चे त्यांनी ‘पोस्ट’ केले.
— पु. ल. देशपांडे (बटाट्याची चाळ)
Leave a Reply