‘याज्ञसेनीला प्रत्यक्ष पाहताच सत्यभामा अत्यंत प्रभावित झाली होती. तिचे सौंदर्य सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी होते. प्रसंगी दाहकही बनत होते. द्यूतसभा आपल्या बुद्धिवादाने जिकून निरुत्तर करून आपल्या पतींना मुक्त करणार्या या लोकविलक्षण स्त्रीला पाहण्यास ती अधीर झाली होती. पण चार दिवसांच्या सहवासाने तिच्या मनी दाटत होतं ते वेगळचं. पाच पतींशी तिचे वागणे, आणि पाचांचे तिच्याशी वागणे ती पाहत होती. युधिष्ठिर तिला ‘देवी’ म्हणून संबोधित होता. भीम तिला पांचाली म्हणत होता. अर्जुन तिला कृष्णे म्हणून बोलावीत होता.नकुलसहदेव द्रौपदी म्हणत होते. प्रत्येकाचे तिच्याशी वागणे अशा प्रसन्नतेचे की पाहणार्याला वाटावे हिचे त्याच्यावरच अधिक प्रेम आहे. पाची भ्राते तिच्याच कलाने वागत होते. तिच्याच आधीन होते. या सगळ्याच गोष्टींचे तिला अत्यंत आश्चर्य वाटत होते, कुतूहल वाटत होते.
— डॉ. सुमति क्षेत्रमाडे
Leave a Reply