आबा घरी आला तेव्हा मुक्ताबाई चुलीवरचे कोरड्यास ढवळीत होती, व पलीकडे हैबती बैलाच्या गळ्यात घालण्यासाठी मोठाल्या घुंगरांचा पट्टा तयार करीत होता. आबाने अविर्भावाने कोर्टातून आणलेल्या नोटा बायकोपुढे ठेवीत म्हटले, ‘‘शिरपति ग्येला तवा त्यो शिकारी शंभर रुपये देऊन मला गप बसवाया पहात व्हता. पन कोडतात खेचला तवा कसा इनसाफ झाला पघ. पाचशे रुपे ठोठावलं कोडतानं ! पाह्यलंस -?’’ नवर्याचे ते उद्गार ऐकून मुक्ताबाईला बरे वाटले नाही. उलट नाजूक जागी जखम झाल्याप्रमाणे तिची चर्या झाली आणि लगेच तिच्या डोळ्यांतून आसवे ओघळली. तिने झटकन् त्या नोटा उचलल्या आणि चुलीत टाकल्या. त्या नोटांचा एकदम भक्कदिशी जाळ झाला, व त्यांची लगेच राख झाली.
— ना. सी. फडके (निसर्ग, माणूस व देव)
Leave a Reply