गोखले यांच्या आयुष्यातील १८९५ ते १९०५ हा दहा वर्षांचा काळ कसोटीचा आणि कळसाचाही. सार्वजनिक जीवनातील कसोटीला ते उतरले. वेल्बी कमिशनपुढील साक्ष, प्रथम प्रांतिक व नंतर केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व, सर्व्हंट्स ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना आणि नंतर काँग्रेसचे अध्यक्षपद अशा क्रमाने गोखले हे सार्वजनिक जीवनात कळसाला पोहचले. तथापि हा मार्ग सुलभ नव्हता. १८९५ साली त्यांच्या मनाला तीव्र वेदना देणार्या दोन घटना घडल्या. एक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू. आगरकर हे गोखले यांचे केवळ कॉलेजमधील सहकारी व वरिष्ठ नव्हते, ते त्यांचा एक आदर्श होते.
–गोविद तळवलकर (नेक नामदार गोखले)