चहूकडून खजुरीचं गच्च बन. वरून काही ऊनही पाझरत नव्हतं. सुखद गारवा. सर्वात मजा म्हणजे प्राजक्ताखाली श्रावणात फुलांचा पडावा तसा गुळगुळीत खारकांचा सडा भुईवर पडलेला. इथल्या खारका सुरकुतलेल्या नसतात. लक्षावधींचा खच. काही नुकत्याच पडलेल्या स्वच्छ, तर काही किड्यामुंग्यांनी अर्धवट खाल्लेल्या. पायाखाली खारका दिसल्यावर ‘टिप् फुले टिप्’च्या चालीवर मी ‘टिप् खारीक टिप्’ करत सुटले. वाळूवर पडल्यानं तशी ती तुकतुकीत. वरवरची रेती फुंकायची आणि मधाळ गोड खारीक तिथंच मटकवायची. उन्हात पूर्ण पिकल्यानं चवीला गुळचट खमंग लागत होत्या. कुणा खादाड मुलाच्या स्वप्नात शिरल्यागत झालं होतं. थांबतेय कशाला ?
– मीना प्रभू (इजिप्तायन)