कुसुमावती देशपांडे (पिठोरी अमावस्या)

झोपडीच्या कडेला एका दगडावर ती बसली होती. पुढ्यात दोन-तीन खरकटी भांडी होती. एकदोन थाळे होते. त्यांच्या खालची जमीन खरकटे, राख व पाणी खाऊन खाऊन काळी पडली होती. गाळाने बरबटली होती. जवळच चारपाच दगड व विटांचे तुकडे जमवून बनविलेल्या एका ओटेवजा जागेवर एकदोन घासलेली भांडी होती. पलीकडे पाण्याची दोन मडकी होती. भांड्यांचे पाणी रोज एकाच मार्गाने वाहत जाई व आपल्या घाणीचा व काजळाचा रंग मागे ठेवून येई. त्यामुळे आपोआप एक काळीकुट्ट, रेंद्याने भरलेली मोरी तिथे बनली होती. वाहत वाहत ते पाणी आपल्यापेक्षाही गलिच्छ अशा रस्त्याच्या कडेच्या नालीत जाऊन मिळे.

– कुसुमावती देशपांडे (पिठोरी अमावस्या)