ट्रॅम मध्ये बसून जाताना काही काही ठिकाणी अगदी नकोसे होते. ग्रँट रोडच्या चौकात आले व गाडीतून थोडे बाहेर पाहिले की, हातपाय अधू झालेले तरुण लोक, डोळे गेलेली पोरे पुढे करून उभ्या असलेल्या म्हातार्या बाया, उघड्या पोटावर थापट्या मारीत पडलेली पंगू माणसे, आणि भेसूर महारोगी-असे सगळे भोवती जमा होतात. त्या लोकांच्याकडे पाहण्याचे मला धैर्यच होत नाही. म्हणून लक्ष नसल्यासारखे करून मी सरळ ट्रॅम च्या तोंडाकडे पाहतो. पण ते सगळे ढोंग असते. माझे खरे लक्ष त्या लोकांच्याकडेच असते. त्या लोकांच्याकडे प्रत्यक्ष पाहावे तर नाना प्रकारचे तरंग मनात उत्पन्न होतात. आपण कोणी तरी गुन्हेगार आहोत, असे वाटू लागते. त्यांच्या डोळ्याला डोळा लावून पाहताना भयाने घुटका गिळण्याची पाळी येते, व माझी उपजत हास्यविनोदाची बुद्धी अगदी लोपून जाते.
– श्री. म. माटे (हास्याचा शोध)