तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ हा नाश अहंकाराचा ।। पावसांत भिजत नगरप्रदक्षिणा करावी. निष्ठेने भजनें-कीर्तनें ऐकावीत. त्या दुर्गंधीतच खुरमुंडून राहावे, आणि वारी संपली की विठ्ठलस्मरण करीत चालू लागावे. त्यांच्या कष्टांना काही सीमा नव्हती. हालअपेष्टांना मर्यादा नव्हती. पण सहनशक्ती आणि धैर्य तर अमर्याद होते. गाडगेबाबांच्या हे ध्यानी आले होते. त्यांचा आराध्य देव पांडुरंग केवळ रावळांतच उभा नव्हता. तो या अस्पृश्यांच्या रूपाने दर वारीला या यातना सोशीत होता. हे कष्ट भोगीत होता. निमूटपणे. मुखावाटे एक शब्दही न उच्चारतां. हे जणूं काही जन्मव्रतच आहे. हे आपल्याला सोसलेच पाहिजे. याहून बर्याची अपेक्षा आपण करूच शकत नाही. आपल्या नशिबी याहून चांगली व्यवस्था दैवानेंच लिहिली नाही ! स्वतः बाबांनी देखील हेच कष्ट सोसले होते. त्यांना तर वारीत कुणीच सपरीखाली देखील जागा दिली नव्हती.
– गो. नी. दाण्डेकर (श्रीगाडगेमहाराज)
Leave a Reply