त्यांच हे बहरणं पाहूनच माझ्या मनात मग वेलींमधलं नि जीवनातलं नाजुक नातं हळूहळू उमलू लागलं, उकलू लागलं. जीवनाला वेलीची उपमा देण्याची कल्पना ज्याच्या कुणाच्या मनाला प्रथम स्पर्शून गेली असेल, त्या मी कधीही न पाहिलेल्या अनामिकाचा आठव मला झाला. त्याला झालेला तो मुलायम स्पर्श अगदी अलगदपणे पावलं न वाजविता माझ्या मनाच्या कोशाजवळ आला नि त्यालाही हलकेच स्पर्शून गेला…या स्पर्शानं मला अथांग जीवनाचा एकेक पदर उलगडून दाखवायला सुरवात केली…आणि मग वाटलं, की खरंच ! जीवन हे किती अनोखं आहे, किती ‘अपार’ आहे, किती खोल खोल आहे नि किती ‘अथांग’ आहे ! त्याचे सारेच पदर कदाचित आपल्या लक्षात येणार नाहीत; पण काही पदर मात्र आपल्या मनात सतत घर करून राहतात.
– डॉ. यू. म. पठाण (दिवस फुलायचे)
Leave a Reply