त्यांच्या शांत मुद्रेवरील संतोषाचे स्मित पाहून मला बरे वाटले. त्यांची ती भव्य शरीरयष्टी, काळासावळा पण सतेज वर्ण, चितेचे कंगोरे पडलेले उंच कपाळ व डोक्याला बांधलेला शुभ्र फेटा बघून माझे मन किचित हरखले. त्यांच्या तोंडावर देवीचे व्रण खोल आणि दाट पसरले होते; व दोन्हीही डोळ्यांच्या अगदी खाचा झाल्या होत्या. आटून कोरडे पडलेले सुंदर सरोवर जसे दिसावे, तसे त्यांचे ते विशाल डोळे दिसत होते. त्या डोळ्यांकडे नजर जाताच मी अगदी थिजून गेलो; माझा सगळा आनंद नष्ट झाला व मला त्यांची दया आली. पण त्यांचे सर्व व्यवहार संथपणाने चालले होते. जणू काही त्यांच्यात आणि इतरांत फरक कसा तो नव्हताच.
– ग. त्र्यं. माडखोलकर (दिलरुबा)
Leave a Reply