नाटक ह्या गोष्टीचा धसका घ्यायला आणखीही एक कारण घडलं होतं. माझा एक मामा नाटक कंपनीत बोर्ड रंगवायला होता. त्याचं बोट धरून लहानपणी मी ‘द्रौपदीवस्त्रहरण’ नाटकाला गेलो होतो. पहिल्या दोन अंकानंतर माझ्या त्या धाकूमामांनी मला पडद्यामागं नेलं. बघतो तर ती द्रौपदी आधीच वस्त्रहरण झाल्यासारखी नुसतीच चोळी घालून तंबाखू चोळीत उभी होती. हा पुरुष होता हे बर्याच वर्षांनी मला कळलं. दुःशासनाच्या पाट्यार्नं मला जवळ बोलावलं. दुःशासन वगैरे लोक चहा पितात हे मला ठाऊक नव्हतं. मला जवळ बोलावून दुःशासन म्हणाला, ‘‘चहा पितोस का बाळ ?’’मी म्हटलं, ‘‘हो, पितो की – ’’ ‘‘पिऊ नये हो, प्रकृतीला वाईट असतो तो !’’ असं म्हणून स्वतःचा चहा संपवून त्यानं सुपारी कातरायला सुरुवात केली. तेव्हापासून नाटक हे काहीतरी खोटं प्रकरण आहे असं जे काही मनानं घेतलयं ते आजतागायत.
— पु. ल. देशपांडे (असा मी असामी)