पुष्पावतीची शेवटची उडी पाचशे फुटांवरून होती. घोदीच्या तुषारानं कड्याचा दगड विरून त्याला पोट आले होते. त्यातून वर निळे आकाश घुमटीच्या मेघडंबरीप्रमाणे दिसत होते. पावसाळ्यात धबधब्याच्या आवाजाने येथे कानठळ्या बसतात. येथून नीट दोन हजार फूट भित चढून जाण्याची मेहनत मला करावयाची होती. मी चढू लागल्याबरोबर कड्यावरची वानरे भुभुत्कार करू लागली. त्यांचे प्रतिध्वनी कड्यांवरून रानभागात घुमले. वानरांच्या ओरडण्याने उलट मला चढण्याचे अवसान आले. कारण रानातील पहिल्या संकटाला मी तोंड देऊ शकलो होतो.
— र. वा. दिघे (आसरा)