बंछीचे डोळे घारे बदामी रंगाचे असून, उन्हाच्या तिरपेने त्यात तांबड्या रेषा उमटलेल्या होत्या; त्याच्या डाव्या गालावर लहानसे निळसर ल्हासे असून ओठ सारखे मिटून धरण्याची त्याला सवय होती; गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या हनुवटीवर एक लांबच्या लांब वण पडला होता; जसा काही काटेर्याने निघालेला खोल ओरखडा भरून निघाला आहे; मांडीपासून त्याच्या पायाचा घाट व पावलांचा मलिन सुकुमारपणा शहरात शाळेत जाणार्या मुलालाच शोभला असता; बंछी बोलू लागला म्हणजे त्याच्या आवाजाची पातळ किनारी, एखाद्या आडवळणी गोठ्यात पॅरिसची पेटी वाजवावी तशी ऐकू येई; रानावनातून एकटे दुकटे पळावे आणि प्रसंग पडल्यास मागून खावे हे त्याच्या अंगवळणी पडले होते.
— श्री. म. माटे (बन्सीधर ! तू आता कुठे रे जाशील)