ब्रह्मचर्य म्हणजे कायावाचामनेकरून सर्व इंद्रियांचा संयम. या संयमासाठी वर दर्शविल्याप्रमाणे त्यागाची आवश्यकता आहे हे मला दिवसेंदिवस स्पष्ट दिसू लागले. आजही दिसत आहे. त्यागाच्या क्षेत्राला सीमा नाही, जशी ब्रह्मचर्याच्या महिम्याला नाही. अशा तर्हेचे ब्रह्मचर्य अल्प प्रयत्नाने साध्य होण्यासारखे नाही. कोट्यवधी लोकांच्या बाबातीत हे फक्त दूरचा आदर्श म्हणूनच राहणार. कारण की प्रयत्नशील ब्रह्मचारी स्वतःमधील न्यून नेहमी डोळ्यांपुढे राखील. स्वतःमध्ये कोनाकोपर्यात राहिलेले विकार हुडकील आणि ते काढून टाकण्याचा सतत प्रयत्न करील. जोपर्यंत विचारांवर एवढा ताबा आला नाही, की इच्छेशिवाय एकही विचार येणार नाही, तोपर्यंत ब्रह्मचर्य पूर्ण झाले नाही. प्रत्येक विचार हा विकारच आहे. त्याला ताब्यात आणणे म्हणजे मनाला ताब्यात आणणे.
— मोहनदास करमचंद गांधी (सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा)